राज्यातले अनेक दहावी आणि बारावीचे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. काही विद्यार्थी पास झाले, तर काही विद्यार्थ्यांना अपयश आले. जे विद्यार्थी नापास झाले आहेत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या विद्यार्थ्यांना फेर परीक्षा, म्हणजेच पूरवणी परीक्षा देता येणार आहे.
ही परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळते. यात पास झाल्यास ते पुढील वर्गात प्रवेश घेऊ शकतात.
परीक्षा कधी होणार?
महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावी आणि बारावी पूरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
या परीक्षा जून ते जुलै 2025 या महिन्यांत होणार आहेत.
- बारावीची परीक्षा: 24 जून ते 16 जुलै 2025
- दहावीची परीक्षा: 24 जून ते 8 जुलै 2025
परीक्षा कुठे घेतली जाणार?
ही परीक्षा पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, लातूर, कोल्हापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या शहरांमधील केंद्रांवर होणार आहे.
वेळापत्रक कुठे पाहायचं?
विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक पाहण्यासाठी राज्य मंडळाचं संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर जावं. तिथे विषयानुसार वेळापत्रक दिलं आहे.
संकेतस्थळावर दिलेलं वेळापत्रक हे फक्त माहितीसाठी आहे. परीक्षा सुरू होण्याआधी राज्य मंडळ जे छापील वेळापत्रक देईल, तेच अंतिम असेल.
सोशल मीडियावर फिरणारं किंवा दुसऱ्या वेबसाइटवर असलेलं वेळापत्रक खोटं असू शकतं. त्यामुळे अशा वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नका.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी हे आवाहन केलं आहे की विद्यार्थ्यांनी फक्त अधिकृत आणि छापील वेळापत्रक पाहूनच तयारी करावी.